मुंबई
वातानुकूलित डबा, आरामदायी आसन, काचेच्या खिडक्या आणि छत यासह वैशिष्ट्यपूर्ण असलेला विस्टाडोम डबा (पारदर्शक डबा) आता सीएसएमटी-करमाळी-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसलाही जोडण्यात येणार आहे.
येत्या 15 सप्टेंबरपासून विस्टाडोम डबा प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. त्याचे आरक्षण 14 सप्टेंबरपासून करता येईल, अशी माहिती कोकण रेल्वेच्या अधिकार्यांनी दिली.मुंबई – पुणे – मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई – पुणे – मुंबई डेक्कन एक्स्प्रेस आणि मुंबई – मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसला विस्टाडोम डबा जोडण्यात आला आहे. एका डब्याची प्रवासी क्षमता 40 इतकी आहे. काचेचे छत असलेल्या या डब्यांना गेल्या तीन-चार वर्षांमध्ये प्रवाशांकडून चांगली पसंती मिळत आहे. कोकण मार्गांवर धावणार्या मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला 2018 मध्ये पहिल्यांदा विस्टाडोम डबा जोडण्यात आला होता. या डब्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन 26 जून 2021 रोजी मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्येही विस्टाडोम डबा जोडण्यात आला होता.
प्रवाशांच्या मागणीनंतर मुंबई – पुणे मार्गावरील डेक्कन क्वीनलाही 15 ऑगस्ट 2021 पासून हा डबा जोडण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले. काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, उत्तम आसन व्यवस्था, जीपीएसआधारित माहिती प्रणाली, एलईडी स्क्रिन आदी अनेक सुविधांचा त्यात समावेश आहे.
आता गाडी क्रमांक 22119 आणि 22120 सीएसएमटी-करमाळी-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसलाही विस्टाडोम डबा जोडण्यात आला असून बुधवार, 14सप्टेंबरपासून त्याचे तिकीट प्रवाशांना काढता येईल. 15 सप्टेंबरपासून हा डबा प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. दरम्यान,
1 नोव्हेंबर 2022 पासून तेजस एक्स्प्रेस करमाळीऐवजी मडगावपर्यंत धावणार आहे. मुंबई – मडगावदरम्यान ही गाडी प्रत्येक मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार धावेल आणि मडगांवहून ही गाडी याच दिवशी सुटेल, असे कोकण रेल्वेतील अधिकार्यांनी सांगितले.