प्रतिनिधी, मुंबई
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वेगमर्यादा आणि सीटबेल्टबाबतच्या नियमांचे वाहनचालकांकडून सर्रास उल्लंघन होत असून या प्रकाराची गंभीर दखल घेत महामार्ग पोलिसांनी 17 जुलै ते 3 ऑगस्ट या काळात या मार्गावर विशेष कारवाई केली. या दोन्ही गुन्ह्यांत एकूण साडेसहा हजारांहून अधिक चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यात वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्या चालकांची संख्या अधिक आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घाटात वाहनांसाठी प्रतितास 50 किलोमीटर आणि अन्य ठिकाणी प्रतितास 100 किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये आणखी पाच टक्के सवलत देण्यात आली आहे. यापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणार्या वाहनांविरोधात द्रुतगती मार्गावर असलेल्या इंटरसेप्टर वाहनांवरील सीसी टीव्ही तसेच स्पीडगनच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. याविरोधात 17 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत महामार्ग पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कारवाई केली. बोरघाट, पळस्पे जवळील खालापूर टोल प्लाझा, वडगाव येथे कारवाई करण्यात आली. बोरघाटात वाहनचालक अतिवेगाने वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले. येथे तीन हजार 853 वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. या तीनही परिसरात एकूण चार हजार 77 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.