मुंबई : मुंबईत गेल्याकाही दिवसांपासून करोनारुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून झोपडपट्टया व चाळींमध्ये देखील रुग्ण आढळू लागले आहेत. मुंबईतील ११ चाळी व झोपडपट्टया सध्या प्रतिबंधित आहेत. ऑगस्टच्या मध्यावर झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या पूर्ण आटोक्यात आल्यामुळे झोपडपट्ट्या पूर्ण कंटेनमेंटमुक्त झाल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना वाढतो आहे. ‘डी’ वॉर्डमध्ये झोपडपट्टीत पहिला कंटेनमेंट झोन जाहीर झाला. त्यानंतर गेल्या दोनच दिवसांत कंटेनमेंट झोनची संख्या २ वरून ११ वर पोहोचली आहे.
मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे. या झोपडपट्टीत दाटीवाटीने लोक राहत असल्याने गेल्यावर्षी धारावी कोरोनाची हॉटस्पॉट झाली होती. गेल्या वर्षी पहिल्या लाटेदरम्यान धारावीत दिवसाला ७० हून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. ८ एप्रिलला दुसऱ्या लाटेत सर्वाधिक ९९ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने धारावीत गेले काही महिने १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. कित्येक वेळा धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, आता मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याने धारावीतही रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या २४ तासात धारावीत २४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी १८ मे ला सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली होती. आज २४ नवे रुग्ण आढळून आल्याने धारावीतील एकूण रुग्णांची संख्या ७,२९७ इतकी झाली आहे. आतापर्यंत ६,७६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या ११९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
गेल्यावर्षी ऑगस्ट २०२० पासून मुंबईतील करोनाची साथ आटोक्यात येऊ लागली व त्यानंतर मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या शून्यावर आली. दुसऱ्या लाटेत जास्तीत जास्त रुग्ण हे इमारती, उच्चभ्रू गृहनिर्माण संस्था यामधील होते. त्यामुळे झोपडपट्टया प्रतिबंधित होण्याचे प्रमाण कमी होत शून्यावर आले होते. मात्र गेल्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून झोपडपट्टय़ांमध्येही रुग्ण आढळू लागले असून मुंबईतील ११ चाळी व झोपडपट्टय़ा प्रतिबंधित असून त्यात सुमारे सव्वा लाख लोकसंख्या आहे. करोना रुग्णवाढीचा वेग सध्या जास्त असून त्यातच झोपडपट्टय़ांमध्ये संसर्ग पोहोचल्यामुळे पालिकेची चिंता वाढली आहे. झोपडपट्टय़ांमध्ये रुग्ण वाढल्यास या रुग्णांच्या व त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या विलगीकरणावर भर दिला जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
पुन्हा वाढली डोकेदुखी
मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना आता पुन्हा एकदा वेगाने वाढतो आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला १००पर्यंत कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आता ही संख्या रोज सहा हजारांवर गेली आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येने मुंबईची चिंता वाढवली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या संख्येने वाढणारे भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. यामध्ये दोन रुग्ण आढळल्यास इमारतीचा मजला, तर पाच रुग्ण आढळल्यास पूर्ण इमारत सील केले जात आहे. तर झोपडपट्टीमध्ये पाच ते दहा रुग्ण आढळल्यास संबंधित भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला जातो आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कुर्ल्यामध्ये ७, ग्रँट रोड-गिरगाव परिसर ३ आणि वरळी विभागात १ असे ११ कंटेनमेंट झोन पालिकेकडून जाहिर करण्यात आला आहे.