नवी मुंबई : कोरोना महामारीच्या काळात रुग्णालयांमधील ढिसाळ कारभारामुळे अनेक अडचणींना सामान्यांना सामोरं जावं लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यावेळी रुग्णालयांमध्ये खाटा मिळण्यांपासून ते तेथील खर्च अशा अनेक गोष्टींमुळे रुग्णालयांतील व्यवस्थापनासंबधी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. दरम्यान यामुळे आता रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेने याविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. त्यांनी दरपत्रक नसलेल्या तब्बल 240 रुग्णालयांना नोटीस पाठवली आहे.
कोरोना काळात सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक करण्यात आली होती. अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. ज्यामुळे रुग्णालयांमधील व्यवस्थापनावरही अनेक प्रश्न उठवण्यात आले होते. त्यामुळे शासनाने महानगर पालिकांकडून रुग्णालयांत कोरोनावरील उपचारांसह इतर उपचारांचे दरपत्रक लावून घेतले जात आहे. मात्र काही रुग्णालयांमध्ये विविध आजारावरील उपचार करण्यासाठी दरपत्रक लावण्यात आले नसल्याचेही समोर आले. ज्यानंतर ही बाब पनवेल महानगर पालिका आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत पनवेल आरोग्य विभागाकडून संबधित रुग्णालयाच्या दर्शनी भागात उपचारांचे दरपत्रक लावण्यात याव्यात अशी सूचना दिली आहे. त्यांनी याबाबतच्या नोटीसा रुग्णालयांना पाठवल्या आहेत.