कोल्हापूर :-
कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना संरक्षक भिंतीवरून चेंडू टाकून गांजा पुरवण्याचा प्रयत्न करणार्याक तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. कळंबा कारागृहाच्या उत्तरेकडील संरक्षक भिंतीनजीक ही घटना घडली असून यामध्ये वैभव विवेक कोठारी, संदेश नितीन देशमुख, अमित सुनिल पायगुडे या तिघांना कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही पुणे शहरातील बिबेवाडी, के. पी. नगर याठिकाणचे रहिवाशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पकडलेल्या या तिघांचा मित्र पुण्यातील गुंड शेख नामक संशयित आरोपी कळंबा कारागृहात कच्चा कैदी म्हणून शिक्षा भोगत आहे. त्याला गांजा पुरवण्यासाठी या तिघांनी टेनिस चेंडू कापून त्यात प्रत्येकी 5 ते 10 ग्रॅम गांजा भरून संरक्षक भिंतीवरून आत फेकण्याचा प्रयत्न करताना अटक केली आहे.